जीवन म्हणजे एक सुंदर प्रवास. प्रत्येक वळणावर नवे अनुभव, नवी आव्हाने आणि नवी स्वप्ने असतात. पण कधी कधी स्त्रीला आपल्या जबाबदाऱ्या, बंधने आणि परिस्थितीमुळे स्वतःसाठी जगण्याचा वेळच मिळत नाही. ती आई, पत्नी, मुलगी, बहीण म्हणून सतत दुसऱ्यांसाठी झटत राहते. मात्र, तिचं स्वतःचं एक वेगळं अस्तित्वही आहे. तिचं आयुष्य अजून पूर्ण झालेलं नाही… ती अजून जगायचं बाकी आहे!
स्वतःसाठीही जगायला हवं
आजपर्यंत तिने इतरांसाठी अनेक त्याग केले, अनेक स्वप्ने मोडली, अनेक वेळा स्वतःला दुय्यम स्थान दिले. पण आता वेळ आली आहे स्वतःसाठी काहीतरी करण्याची. तिच्या मनातही काही इच्छा आहेत, काही अपूर्ण स्वप्ने आहेत. तिने स्वतःसाठी थोडा वेळ द्यायला हवा, स्वतःच्या आनंदासाठी जगायला हवं.
नवी स्वप्ने, नवे मार्ग
तिच्या आयुष्यात अजूनही संधी आहेत. शिकायचं आहे, अनुभव घ्यायचे आहेत, नवीन गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. वयाचं बंधन नाही, परिस्थितीचं ओझं नाही—फक्त ठरवायचं आहे की आता स्वतःसाठीही काही करायचं. तिच्या मनात एक नवा उत्साह आहे, एक नव्या उंचीवर पोहोचायची जिद्द आहे.
तिला स्वतःला सिद्ध करायचं आहे
ती केवळ घरापुरती मर्यादित नाही, तर तिच्यातही प्रतिभा, कौशल्य आणि स्वप्ने आहेत. तिला स्वतःला सिद्ध करायचं आहे. समाजाने तिला दिलेल्या चौकटीतच थांबायचं नाही, तर स्वतःची नवी ओळख निर्माण करायची आहे.
तिचा आत्मसन्मान आणि स्वातंत्र्य
स्त्री फक्त कुटुंबासाठी नसते, ती स्वतःसाठीही असते. तिच्या आनंदाचा, इच्छांचा आणि निर्णयांचा आदर होणं गरजेचं आहे. तिचं हसणं, तिचं आयुष्य तिच्या मर्जीप्रमाणे जगणं, हेही तितकंच महत्त्वाचं आहे.
खऱ्या अर्थात सांगायचं झाल तर, तिच्या आयुष्याचा काही भाग नक्कीच गेला आहे जबाबदाऱ्यांमध्ये, पण तिचं जीवन अजून संपलेलं नाही. तिची स्वप्ने पूर्ण होणं बाकी आहे, तिच्या उडण्याचे पंख पसरायचे बाकी आहेत, तिच्या मनमोकळ्या हसण्याचे क्षण अजून यायचे आहेत. ती अजून जगायचं बाकी आहे!
लेखन :- श्री. विजय वसंत अहिरे "विजयश्री"
उपसंपादक, शिक्षक ध्येय साप्ताहिक ,महाराष्ट्र राज्य
कुबेर हायस्कुल व उच्च माध्यमिक विद्यालय, म्हसावद
ता. शहादा जि. नंदुरबार
मो.नं. 9421538621
No comments:
Post a Comment